मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम; वर्षभरात ९२ बालकांसह ५ मातांचा मृत्यू
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाट परिसरात कुपोषणाचा प्रश्न अद्यापही गंभीर स्वरूपात कायम असल्याचे समोर आले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तब्बल 92 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे अस
मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम; वर्षभरात ९२ बालकांसह ५ मातांचा मृत्यू


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाट परिसरात कुपोषणाचा प्रश्न अद्यापही गंभीर स्वरूपात कायम असल्याचे समोर आले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तब्बल 92 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून, याच काळात 5 मातांनीही जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिखलदरा व धारणी या डोंगराळ आणि दुर्गम तालुक्यांचा समावेश असलेल्या या भागात आरोग्य सुविधांचा अभाव ही गंभीर समस्या ठरत आहे. दुर्गम वाड्या-पाड्यांपर्यंत वेळेवर आरोग्य सेवा पोहोचत नसल्याने बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः नवजात आणि एका वर्षाखालील बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक चिंताजनक आहे.

कुपोषण, अपुरी वैद्यकीय सेवा, वेळेवर उपचारांचा अभाव आणि वाहतुकीच्या अडचणी ही या मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या गंभीर प्रश्नावर यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे ओढले होते. तरीदेखील परिस्थितीत अपेक्षित बदल न झाल्याने मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न केव्हा सुटणार, असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.

आरोग्य सुविधांना चालना देण्याचे प्रयत्न

राज्य शासनाने धारणी येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयात रूपांतरित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चुरणी आणि चिखलदरा येथे प्रत्येकी 50 खाटांची उपजिल्हा रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांना गती देण्यात येत असून 300 खाटांच्या रुग्णालयासाठी जागा निश्चितीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande