
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.) सातारा परिसरातील दीपानगर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह दामिनी पथकाच्या तत्पर कारवाईमुळे ऐनवेळी थांबवण्यात आला.वधू-वर बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असतानाच दामिनी पथकाला वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विवाह थांबवला.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब रोजगारासाठी शहरात आले असून, पती बांधकाम साइटवर हमाली तर पत्नी मातीकाम करते. या दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी असून ती देखील आईला कामात मदत करत होती. या मुलीसाठी २५ वर्षीय तरुणाचे स्थळ आले होते. तो पुण्यात काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. चांगले स्थळ असल्याच्या समजुतीत आईने विवाह निश्चित केला होता.
विवाह समारंभ मोजक्याच ५० ते ६० लोकांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र अचानक पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने वऱ्हाडीही गोंधळून गेले.
पोलिस उपनिरीक्षक लता जाधव यांच्या नेतृत्वाखालील दामिनी पथकातील अंमलदार मोनिका दिवे, सुनीता नागलोद, अनिता खैरे, सरिता कुंडारे, साक्षी चंद्रे आणि कविता गवळी यांनी घटनास्थळी कारवाई केली.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत संबंधितांना समज देत विवाह तातडीने थांबवण्यात आला. पालकांचे समुपदेशन करण्यात आले असून संबंधितांना मंगळवारी (ता. २८) बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis