निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील बेफिकीरी उघड! — १५ पैकी फक्त ५ डॉक्टर हजर; मनसे जिल्हाध्यक्ष संतापले
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भिकाणे यांनी अचानक भेट देत रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, तब्बल १५ पैकी केवळ ५
रुग्णालयात अनुपस्थिती


लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

निलंगा तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भिकाणे यांनी अचानक भेट देत रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, तब्बल १५ पैकी केवळ ५ मेडिकल ऑफिसरच ओपीडीमध्ये उपस्थित असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे संतापलेल्या भिकाणे यांनी रुग्णालय प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.

“शासन लाखो रुपये पगार देतं, मग डॉक्टर रोज ओपीडीमध्ये का बसत नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे रुग्णालय म्हणजे आरोग्याचं मंदिर आहे; पण इथे सेवा देणारे ‘देवदूत’च अनुपस्थित असतील, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा?” असा जाब त्यांनी विचारला.

भिकाणे यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला की, “जर डॉक्टरांकडून सेवा करून घेता येत नसेल, तर खुर्च्या रिकाम्या करा. ही नोकरी कोणाच्या मायेपोटी नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी आहे.”

तपासणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली की, किरकोळ किंवा गंभीर रुग्णांनाही प्राथमिक उपचार न देता थेट लातूरला रेफर करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. “छातीत दुखतंय” अशी तक्रार घेऊन आलेल्या रुग्णांनाही सिस्टरमार्फत पुढे पाठवले जाते, ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय काही डॉक्टर लातूर येथे वास्तव्यास असल्यामुळे आपत्कालीन सेवांमध्ये मोठी तफावत निर्माण होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. “तालुक्यातील रुग्णांना तातडीची सेवा मिळणार कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डॉ. भिकाणे यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत स्पष्ट शब्दांत इशारा दिला —

“रुग्णालयाची व्यवस्था सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि संबंधितांवर कारवाईसाठी लढा उभारला जाईल.”

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “शासन कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण काही डॉक्टर बिनधास्तपणे पगार घेऊन खाजगी प्रॅक्टिस करतात. यांना लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

निलंगा उपजिल्हा रुग्णालयापुरतीच ही अवस्था मर्यादित नसून, जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्येही असाच कारभार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकाराकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande