
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. शिवाय प्रमुख गाड्यांचे तिकीट जूनपर्यंत फुल्ल झाले आहेत. परिणामी, ऐनवेळी सुट्टीच्या हंगामात प्रवासाचे बेत आखणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु उन्हाळ्यात रेल्वेला वाढणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून काही मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तरीही वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वेगाड्यांसह स्थानक परिसरही ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. पुणे शहर हे उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी लगबग असते. बाहेरील राज्यातून कामानिमित्त व नोकरीसाठी पुण्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून दररोज किमान दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. परिणामी, एस. टी. बससह रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने येथून तिरूपतीसह मुंबई, दिल्ली, दानापूर, कोलकाता, चेन्नई, गोरखपूर, आदी महत्त्वपूर्ण शहरांत रेल्वेसेवा सर्व प्रवाशांसाठी किफायतशीर आहे. सध्या बारावी, दहावीसह शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु