
जळगाव, 27 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मात्र, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी एका सराईत महिला चोरटीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत केली असून, या अटकेमुळे बसस्थानक परिसरात सक्रिय असलेल्या चोऱ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (६२) या भुसावळ बसस्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ ग्रॅमची सोन्याची पोत लंपास केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी बसस्थानकावरील चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते. तपासाचे चक्र फिरवत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपयांची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत पोलिसांनी जप्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर