पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची विशेष यंत्रणा सज्ज
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी तसेच आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेच्य
PCMC


पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी तसेच आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून तर अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या नियुक्तीचा मुख्य उद्देश नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्तीच्या वेळी तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणे हा आहे. पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार नोडल अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण होतील याची खात्री करावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार विविध विभागांमध्ये समन्वय राखणे अपेक्षित आहे.

स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वैद्यकीय तसेच विद्युत विभागांशी समन्वय साधून पूरनियंत्रण आणि आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिकेची तयारी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande