
परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी “शिका आणि कमवा” उपक्रमांतर्गत प्लेसमेंट ड्राइव्हचे 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम टोयोटा किर्लोसकर मोटार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी उमेदवारांचे वय 18 ते 21 वर्षे असावे. शैक्षणिक पात्रता किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावी. उमेदवारांची उंची किमान 5 फूट व वजन किमान 40 किलो असणे आवश्यक असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान अपेक्षित आहे. तसेच उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम वर्षासाठी दरमहा रुपये 15 हजार 815 व द्वितीय वर्षासाठी रुपये 17 हजार 615 इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी पात्रता मिळेल. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करता येणार आहे.या उपक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन व मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis