
डोंबिवली, 27 एप्रिल (हिं.स.)।
शहरात डांबरीकरणावर मात करीत गल्ली बोळासह मुख्य रस्ते सीमेंट काँक्रीटीकरण माध्यमातून होत आहेत. या कामांबरोबर विद्युत केबल आणि पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा बदलली जात आहे. वीज वितरण कंपनी आणि स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी यांच्यात ताळमेळ जमत नसल्याने कामे थातूरमातूर स्वरूपाची होत आहे. त्यामुळे वीज केबल फॉल्ट मोठ्या प्रमाणावर होत असून फॉल्ट शोधून काढण्यासाठी तासनतास खर्ची होत आहे. परिणामी बत्ती गुल होऊन नागरिकांचा महा भयंकर उकाड्यात जीव गुदमरून त्रास होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलाचे हाल होत असून यावर कशी मात होणार असे लोकं महावितरण कंपनीकडे विचारणा करीत आहेत.
एमआयडीसी विभागात काँक्रिट रस्ते, गटार-नाले आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांच्या चुकीच्या व निष्काळजी कामाने महावितरणच्या केबल्सना त्याचा मोठा फटका बसत असल्याने या उकाड्याच्या भयंकर दिवसांत वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
निवासी भागात अनेक ठिकाणी महावितरणच्या केबल फॉल्ट, केबल जळणे असे प्रकार वारंवार झाल्याने व ते बहुतेक वेळा काँक्रिट रस्त्याच्या खाली आल्याने महावितरणला त्याबदली नवीन केबल ही रस्त्याच्या कडेने किंवा गटारातून टाकून तात्पुरत्या स्वरूपात तातडीने वीज पुरवठा चालू करून ग्राहकांना द्यावा लागत आहे. मिलापनगर तलाव जवळ अशीच गटारावर, उघड्यावर टाकलेली केबल जळल्याने त्या परिसरातील लोकांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तात्पुरते जॉइंट मारून वीज पुरवठा चालू करण्यात आल्याचे समोर येत आहे. महावितरणच्या ज्या केबल्स या फॉल्ट आल्याने रस्त्याच्याकडेने व गटारीतून उघड्या टाकल्या आहेत त्या रस्त्याखालून टाकण्यासाठी काँक्रिट रस्ता तोडावा लागणार आहे परिणामी समस्या आणखीनच वाढत.
अशी परिस्थितीत पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी कुंभारखानपाडा येथे वीज चार तास बंद झाली. यावेळी मात्र काही कारण सांगण्यात आले नाही. फक्त मोठा फॉल्ट आहे काम सुरू आहे अशी नेहमीचीच उत्तरे वीज वितरण अधिकारी देत आहेत अशा तक्रारी नागरिक करीत होते.
जुनी डोंबिवली विभागात रात्री वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येबाबत आता प्रभागातील भाजपा नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या रसिका पाटील, भाजपा मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील, पदाधिकारी व जुनीडोंबिबलीकर महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीत सध्या सुरू असलेला वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास, उन्हाळ्यात वाढलेल्या लोडमुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच आधीच अंदाज असताना आवश्यक क्षमतेचे केबल, लाईन मेंटेनन्स व बदल का करण्यात आले नाहीत अशी विचारणा करणार आहेत.
महावितरण कंपनीला काँक्रीट रोड झाल्यानंतरच का जाग आली? नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना काय करणार ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विचारली जाणार आहेत. विशेष म्हणजे या अशा अनेक प्रश्नाच्या निराकरणासाठी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे हे सुद्धा बरोबर येणार आहेत. फक्त तात्पुरत्या दुरुस्तीतून नाही, तर स्थायी व नियोजनबद्ध उपाययोजना करूनच बत्ती गुल प्रश्न सोडवला गेला पाहिजे असा इशाराही देण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi