
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आणि कचरा विलगीकरण याबाबत राज्यस्तरीय ऑडिट सुरू करण्यात आले असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुण्यात केली.
‘रिसायकलिंग व्हिजन सिरीज 2026’ या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कदम यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गृहसंकुलांमध्ये सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे योग्य प्रकारे कार्यरत आहेत का आणि कचरा विलगीकरणाचे नियम पाळले जात आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सांडपाणी व कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे न झाल्याने जल व मृदा प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन मार्गदर्शक सूचनांनुसार नियमभंग करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट्सचीही तपासणी करण्यात येणार असून, या प्लांट्समधून होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दंडात्मक कारवाईवर भर देत नसून, औद्योगिक आस्थापना व स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठीही सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन 2026 अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि रत्नागिरी येथे परिषदा आयोजित केल्या जाणार असून, रिसायकलिंग व सर्क्युलर इकॉनॉमीला चालना मिळेल, तसेच तरुण नवउद्योजकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या एका भागाचे तांत्रिक सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका आणि जलसंधारण विभाग संयुक्तपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणात्मक कामकाज सुरू असल्याचे सांगत, लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु