
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) : यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी “धोरण कुठंवर आलं गं बाई?” या महिला धोरणावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, गांजवे चौक, पत्रकार भवनाजवळ येथे सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. महिला धोरणांच्या अंमलबजावणीतील प्रगती, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर या चर्चासत्रात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण, ‘मिळून साऱ्याजणी’ या नियतकालिकाच्या संपादिका गीताली वि. मं. तसेच महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे जिल्हा केंद्राचे अंकुश काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. महिला धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या चर्चासत्रात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत चार महिला धोरणांची अंमलबजावणी झाली असून त्यात काही प्रमाणात यश मिळाले असले तरी अनेक क्षेत्रांमध्ये अंमलबजावणीस आव्हाने कायम आहेत. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये “धोरण कुठवर आलं गं बाई?” या मालिकेअंतर्गत चर्चासत्रे आयोजित करण्यात येत आहेत.
या चर्चांमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच धोरण पातळीवर काम करणारे तज्ज्ञ सहभागी होऊन महिला सुरक्षा, महिला शेतकरी हक्क, संपत्तीतील समान वाटा, एकल महिला समस्या, स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि लिंग समानता अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.
या उपक्रमाची सुरुवात 5 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील साहित्य मंदिर सभागृहात झाली होती. तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथेही यापूर्वी चर्चासत्रे पार पडली आहेत.--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु