
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करून रत्नागिरी शहर पोलिसांनी आज पहाटे पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा विक्रीसाठी रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या मोहिमेचे नियोजन केले. या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरात सापळा रचून पहाटे धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी शरद गणपती भंडारे (राहणार सरूड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २७ हजार ९०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली साडेतीन लाखाची इको कार असा एकूण ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी