
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.) :महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अलिबाग आणि उद्यम सखी संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरसोली येथील रामजी देवस्थान, रामनाथ येथे अमृत वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित पाठांतर स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत 6 ते 10 वयोगट तसेच 11 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्तोत्रपठण, श्लोक आणि विविध पाठांतर सादर करत आपली स्मरणशक्ती व कला कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धेसाठी . अनघा मराठे, जान्हवी पाटील आणि . प्रणिता म्हात्रे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि राष्ट्रीय मूल्यांचे संस्कार रुजवण्यासाठी तसेच ईशभक्ती वृद्धिंगत करण्यासाठी अमृत संस्थेकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. बैठी व मैदानी खेळ, स्तोत्रपठण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सामंजस्य आणि शिस्तीची भावना विकसित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमृतचे श्री. शैलेश मराठे यांनी पुढाकार घेतला, तर उद्यम सखी संस्थेच्या सौ. प्रार्थना दामले नागवेकर यांनी सहकार्य केले. तसेच रामजी देवस्थानच्या विश्वस्तांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)