
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।गेवराई शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील मुख्य चौकात अनधिकृतपणे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाप्रशासकीय समन्वय आणि शिवप्रेमींच्या सहमतीने सुरक्षित व सन्मानपूर्वक जागी स्थलांतरित करण्यात आला. गेवराई पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा संवेदनशील प्रश्न अत्यंत शांततेत सुटला असून, यामुळे शहरातील वाहतुकीची मोठी समस्या मार्गी लागली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात पुतळ्याच्या स्थलांतराची प्रक्रिया पार पडली.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, गेवराई शहरातील शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या मध्यभागी हा अश्वारूढ पुतळा रातोरात अनधिकृतपणे उभारण्यात आला होता. गेवराई हे मुख्य बाजारपेठेचे शहर असल्याने, मुख्य रस्त्यावरील या पुतळ्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सुरुवातीला या प्रकरणी अनधिकृत पुतळा उभारणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, लोकभावना आणि शहराची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने हा प्रश्न चर्चेने सोडवण्यावर भर दिला.
पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि तहसील प्रशासनाशी समन्वय साधून स्थानिक राजकीय नेतृत्व, प्रतिष्ठित व्यक्ती आणि शिवप्रेमींसोबत वारंवार बैठका घेतल्या. या सातत्यपूर्ण संवादामुळे सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि पुतळ्यासाठी नवीन ठिकाणी योग्य चबुतरा उभारून त्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या या यशस्वी स्थलांतरामुळे जिल्ह्यात एक आदर्श परंपरा रूढ झाली असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या यशस्वी प्रयोगाबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही बेकायदेशीरपणे उभारलेले पुतळे किंवा स्मारके स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून स्वतःहून स्थलांतरित करावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा उपक्रमांना प्रशासन तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे. दरम्यान, या स्थलांतर प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या शिवप्रेमी नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis