
जळगाव,, 27 एप्रिल (हिं.स.)“शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पिके घ्यावीत, शेतीमध्ये बदल करणे ही काळाची गरज असून रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो,” असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. “कपाशी म्हणजे तुपाशी नाहीतर उपाशी” अशी वास्तव परिस्थिती मांडत त्यांनी रेशीम उद्योगातून उत्पादनाबरोबरच प्रक्रिया व बाजारपेठ निर्माण झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत रेशीम संचालनालय, नागपूर तसेच जिल्हा रेशीम कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम शेती कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमाला यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी रेशीम संचालयालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे उपस्थित होते.
“प्रयोगाशिवाय प्रगती नाही” असे सांगत पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांनी धाडसाने नवीन पिकांकडे वळावे, रेशीम शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा, पाणी बचतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. सध्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतीमध्ये वेगवेगळे उत्पादन घेतली पाहिजे. कापूस मक्का या पिकांपेक्षा रेशम पिक चांगले आहे. रेशीम शेती करण्याबाबत प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर द्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी “तुती लागवडीसाठी शेड, नेट्ससह सर्व बाबींकरिता शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध असून तयार होणाऱ्या रेशीम मालाला बाजारपेठही उपलब्ध आहे. त्यामुळे रेशीम शेती ही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी ठरू शकते,”असे सांगितले . रेशीम उत्पादनातून उच्च दर्जाचे मूल्यवर्धित उत्पादने तयार होत असून त्यातील कोणताही घटक वाया जात नाही, असे सांगत त्यांनी या उद्योगाचे आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.
रेशीम उत्पादनापासून प्रक्रिया, निर्यात व संशोधनापर्यंत मोठी मूल्यसाखळी निर्माण होत असून यामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातच प्रक्रिया युनिट उभारून स्थानिक बाजारपेठ मजबूत करण्यावर भर देत “शेतकरी हा उद्योजक आहे” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. कापूस, मका आदी पारंपरिक पिकांच्या तुलनेत तुती लागवड अधिक फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत तुती लागवड व संगोपनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रेशीम उद्योगाची संपूर्ण साखळी जिल्ह्यात विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटाने काम करावे तसेच रेशीम शेतीत महिलांचा सहभाग वाढवावा, असेही त्यांनी नमूद केले. सध्या असलेले तुती लागवडीचे क्षेत्र यावर्षी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर