लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी गेल्याने खळबळ
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।संपूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या वैशाख वणव्याच्या झळा तीव्र झाल्या असून लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रखर उन्हाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून, गेल्या अवघ्या आठ
उष्माघात


लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।संपूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या वैशाख वणव्याच्या झळा तीव्र झाल्या असून लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रखर उन्हाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून, गेल्या अवघ्या आठवडाभरात जिल्ह्यात उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका तरुण शेतकऱ्यासह एका महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश असल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उष्माघाताचा तिसरा बळी औसा तालुक्यातील एरंडी येथील महेश लिंबाजी इंगोले या २५ वर्षीय तरुणाच्या रूपाने गेला. नेहमीप्रमाणे शेतातील कामे आटोपून महेश प्रखर उन्हात घरी परतला होता. मात्र, घरामध्ये येताच उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थितांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला होता. ऐन उमेदीच्या काळात कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने एरंडी गावावर शोककळा पसरली असून, त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

दुसरी हृदयद्रावक घटना औसा तालुक्यातीलच गोंद्री येथे घडली आहे. येथील ८ महिने ९ दिवसांच्या शिया नेताजी गोरे या चिमुकलीचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शियाची आई बाळंतपणासाठी निलंगा तालुक्यातील तुपडी येथून आपल्या माहेरी गोंद्री येथे आली होती. १९ एप्रिल रोजी दुपारी घरावरील पत्र्याच्या तापमानामुळे उष्णता वाढली होती. पाळण्यात झोपलेली ही चिमुकली बराच वेळ झाली तरी उठली नाही, त्यानंतर ती मृत असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. देवणीकर यांच्या पथकाने गावात धाव घेत चौकशी सुरू केली आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी नातेवाईकांनी उष्माघाताचाच दावा केला आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथेही अशाच प्रकारची घटना घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे हे ६० वर्षीय शेतकरी २० एप्रिल रोजी शेतात काम करत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यात आठवडाभरात उन्हाने घेतलेला हा तिसरा बळी ठरला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना प्रखर उन्हात बाहेर न पडण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे, परंतु ग्रामीण भागात कामाच्या निमित्ताने उन्हात वावरणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे वाढते तापमान पाहता आरोग्य विभागानेही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार

लातूर जिल्ह्याचा तापमानाचा पारा सध्या ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिक उन्हापासून बचावासाठी प्रयत्न करत आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना विनाकारण उन्हात न जाण्याचे, जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून आता या मृत्यूंच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जारी होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande