
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे कार्यरत क्रीडा प्रबोधिनींसाठी २०२६-२७ या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे २८ व २९ एप्रिलला विभागीय चाचण्या घेण्यात येतील.
१९ वर्षांखालील मुला-मुलींना या चाचण्यांमध्ये सहभागी होता येईल. ऍथलेटिक्स, हॉकी, हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्यूदो आणि जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारांसाठी निवड होणार आहे. चाचणीसाठी खेळाडूंनी क्रीडा प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळासोडल्याचा दाखला व आधार कार्ड या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे. जिम्नॅस्टिक्सची चाचणी २८ व २९ एप्रिलला मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, खडकेश्वर येथे होईल. याच दिवशी हॉकी व हँडबॉलची चाचणी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे होईल. फुटबॉल व ऍथलेटिक्सची चाचणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मैदानावर पार पडेल. जलतरण स्पर्धा सिद्धार्थ जलतरणिका, गरमपाणी येथे, तर सायकलिंगची चाचणी विद्यापीठ परिसरात होणार आहे. फक्त ज्यूदोची चाचणी २८ एप्रिलला सकाळी नऊ वाजता जिल्हा ज्यूदो संघटना हॉल, एन-३ सिडको येथे होईल.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis