
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.) : सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा १७ वा पदवीदान समारंभ “डिझाईन शोकेस 2026” हा विमानतळ कॅम्पस येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन नामांकित डिझाईन शिक्षणतज्ज्ञ तसेच आयआयटी बॉम्बे येथील आयडीसी स्कूल ऑफ डिझाईनचे माजी प्रमुख प्रा. जी. व्ही. श्रीकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या संचालिका डॉ. संजीवनी अयाचित, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून रे अँड रे-सेरेमोनियलचे संस्थापक आणि शाश्वत डिझाईनचे पुरस्कर्ते श्री अतीव आनंद यांना फॅशन शोसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
“डिझाईन शोकेस 2026” मध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये कम्युनिकेशन डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन तसेच फॅशन डिझाईन या आठ प्रमुख शाखांचा समावेश होता. ग्राफिक डिझाईन, यूजर एक्सपीरियन्स डिझाईन, अॅनिमेशन, फिल्म डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन आणि इंटीरियर स्पेस डिझाईन यांसारख्या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन यावेळी घडले.
या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संशोधन क्षमता, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि उद्योगासाठीची तयारी अधोरेखित झाली. कार्यक्रमादरम्यान ओपन डे, फॅशन शो, प्लेसमेंट वीक तसेच शैक्षणिक पुरस्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते.
डिझाईन, नेतृत्व आणि नवकल्पनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. हा दोन दिवसीय सोहळा पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु