
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। शहर उत्तर मतदारसंघातील राजकारणात सोमवारी एक वेगळाच ‘पोस्टर पॉलिटिक्स’चा प्रयोग पाहायला मिळाला. आतापर्यंत आपल्या कार्यक्रमांमध्ये काही ठराविक चेहऱ्यांपासून जाणीवपूर्वक अंतर राखणारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी अचानक घेतलेला हा यू-टर्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.प्रभाग क्र. २ मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंठेवारी शिबिराच्या बॅनरवर यावेळी चक्क पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महापौर विनायक कोंड्याल यांचे फोटो झळकले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम आमदार देशमुख आणि त्यांच्या चिरंजीवांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.आतापर्यंत “आपलं काम, आपली टीम” या फॉर्म्युल्यावर चालणाऱ्या देशमुखांनी अचानक ‘सर्वसमावेशक’ बॅनर का लावला? हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. काही जाणकारांच्या मते, हा केवळ बॅनर नसून ‘संदेश’ आहे — आणि तोही थेट सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचणारा.
“इतके दिवस फोटो टाळणारे देशमुख आता एकाच बॅनरवर सगळ्यांना जागा देतात, म्हणजे काहीतरी ‘सेटिंग’ तर झाली असावी!” अशी मिश्कील प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.तर दुसरीकडे, काही जण याला “विकासासाठी हातमिळवणी” असे नाव देत आहेत. “कामासाठी एकत्र येणं गरजेचं आहे,” असा बचावही समर्थकांकडून केला जातोय.
राजकारणात फोटो हे फक्त फोटो नसतात, तर ते समीकरणांचे आरसे असतात. त्यामुळे या एका बॅनरने सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, की हा फक्त ‘कार्यक्रमापुरता समन्वय’ होता, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड