
नांदेड, 27 एप्रिल (हिं.स.)।स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा कौशल्य विकासासाठी 'स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबवले जाणार असून १ ते १५ मे या कालावधीत शिबिर पार पडणार आहे.
या उन्हाळी शिबिरातविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून विविध मैदानी व इनडोअर खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानी खेळांमध्ये ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आणि हॉकीचा समावेश आहे. तर इनडोअर व इतर प्रकारांमध्ये जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, एरोबिक्स, बॉक्सिग, योगा, वेटलिफ्टिंग तसेच फिजिकल फिटनेस प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीयदर्जाची भव्य खेळाची मैदाने व आधुनिक इनडोअर स्टेडियमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे.शिबिरार्थ्यांसाठी मोफत बस सेवा तसेच मोफत टी-शर्टचीही सोय करण्यात आली आहे. ०५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांना या शिबिरात सहभागी होता येणार असून, दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल. शिबिरासाठी प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis