
परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)।
NEET 2026 ही महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षा 3 मे 2026 रोजी होणार असून, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना संपूर्ण तीन तास विनाअडथळा वेळ मिळावा, अशी मागणी पालक वर्गाने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गेली दोन वर्षे सातत्याने मेहनत घेतली आहे. त्यामुळे परीक्षेचा प्रत्येक मिनिट त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, अनेकदा परीक्षा सुरू झाल्यानंतरही हॉलतिकीट तपासणी, उपस्थिती नोंद, सह्या, अंगठ्याचे ठसे आदी प्रक्रिया सुरूच राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो. या सर्व प्रक्रिया पेपर सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवरील सुविधा सुधारण्यावरही भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वेळेचे अचूक नियोजन करता यावे यासाठी प्रत्येकाच्या समोर स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी घड्याळांची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. सध्याच्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हॉलमध्ये कुलर किंवा योग्य वायुविजनाची सोय करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, शिस्तबद्ध व अनुभवी पर्यवेक्षकांची नेमणूक करून परीक्षा हॉलमध्ये शांतता राखण्यावर विशेष भर देण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व त्यांचा मौल्यवान वेळ वाया जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकार्यांनी संबंधित परीक्षा केंद्रांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. केेदार खटींग, डॉ. आनंद कुलकर्णी उंडेगांवकर, अच्युत मोरे, डॉ. व्यंकटेश कानसटवाड, डॉ. सतीश मुक्कावार, डॉ. गोपाळ साळवे, भगवान कोरडे, अशोक गोरे, अॅड. मिलींद यादव, डॉ. सुभाष सिसोदीया, राजकुमार खरात, डॉ. मनोज सोनी, डॉ. महेश सोनी, डॉ. कालिदास चौधरी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis