रामकुंडातील पाणी दूषित; भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि गोदातीरी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रामकुंड परिसरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असून पाण्यात मोठ्या प्रमाणावर किडे व अळ्या निर्माण झाल्यामुळे भाविकांच्या आरोग्याबाबत चिंता व्
There are insects, worms and


नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि गोदातीरी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रामकुंड परिसरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असून पाण्यात मोठ्या प्रमाणावर किडे व अळ्या निर्माण झाल्यामुळे भाविकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे गोदावरी नदी पात्रातील पाणी विविध ठिकाणी अडविण्यात आले आहे. विशेषतः अहिल्याबाई होळकर पूल परिसरात पाण्याचा प्रवाह थांबल्याने रामकुंड, लक्ष्मण कुंड, सीता कुंड आणि गाडगे महाराज पूल परिसरात पाण्याची पातळी अत्यल्प झाली आहे.

गेल्या सुमारे महिनाभरापासून पाण्याचा प्रवाह थांबलेला असल्याने रामकुंडातील पाणी हिरवेगार झाले असून त्यात किडे व अळ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देश-विदेशातून श्रद्धेपोटी येथे येणाऱ्या लाखो भाविकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. “राम तेरी गंगा मैली” अशी स्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे. प्रशासनाशी संपर्क साधूनही महापालिका किंवा जलसंपदा विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या रामघाटाच्या काँक्रिटीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साधू-महंत, पर्यावरणवादी संघटना आणि पुरोहित संघ यांनी हे काँक्रिटीकरण काढण्याची मागणी केली आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार या परिसरातून गुप्त नद्यांचा प्रवाह असल्याचे मानले जाते, मात्र या ऐतिहासिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

काँक्रिटीकरण हटविण्यासाठी किमान सात ते आठ महिने रामकुंड परिसर बंद ठेवावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिंहस्थपूर्वी हे काम होणार का, आणि प्रशासन याबाबत भूमिका स्पष्ट करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande