
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे जलसाठा वाढीसोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसही मोठी मदत होत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.हि. झुरावत, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, तंत्र अधिकारी विजय चौधरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजीव शिंदे, सचिन खंबाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) रघुनाथ गवळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, तसेच वन व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, ‘जलयुक्त शिवार 2.0’ अंतर्गत गावनिहाय जलसंधारणाची कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. पाणलोट क्षेत्र विकास, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन संरचना उभारणी ही कामे तांत्रिक निकषांनुसार प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे.
तांत्रिक मान्यता प्राप्त कामांचे तालुकानिहाय अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच सुरू असलेली, पूर्ण झालेली आणि प्रलंबित कामे, तपासणी व सर्वेक्षण यांची माहिती अद्ययावत ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
पूर्ण झालेल्या कामांचे जिओ-टॅगिंग प्राधान्याने करण्याचे निर्देश देत, त्याशिवाय पुढील निधी वितरण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नाला खोलीकरण करताना मोजमाप, खोली, रुंदी आणि गाळ काढण्याची प्रक्रिया तांत्रिक मानकांनुसारच करावी, असेही त्यांनी सांगितले.
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’, ‘जलशक्ती अभियान’, तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि पाणलोट विकास घटक 2.0 या योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.हि. झुरावत यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV