
नंदुरबार, 28 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, टोकरतलाव रोड येथे पार पडणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली.
राज्यातील सर्व मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ एकाच वेळी सकाळी 8 वाजता आयोजित केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, निमंत्रितांना मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी 7.15 ते 9 या वेळेत इतर कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित करू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित संस्था किंवा कार्यालयांनी आपले ध्वजवंदन सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावे.
या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर