
परभणी, 28 एप्रिल (हिं.स.)। “ज्ञान वाढवून ते जगाला देण्यासाठी सावित्री-ज्योतीप्रमाणे स्त्री शिकली पाहिजे. जगाकडे नीट पाहण्याची दृष्टी देणारे शिक्षण ही आज काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील कमलताई. जामकर सांस्कृतिक सभागृहात डॉ. आशा सोपानराव गीरी लिखित ‘अण्णाभाऊंच्या कथानायिका’ या समीक्षात्मक ग्रंथासह ‘नक्षी’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. डॉ. लुलेकर म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाला दिलेले महत्त्व आजही प्रेरणादायी आहे. शिक्षणातून समता, वास्तवाचे भान आणि सामाजिक परिवर्तन शक्य असून स्त्री शिक्षणाची आस्था समाजात अधिक दृढ होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. प्रमुख उपस्थितीत विजयराव जामकर, डॉ. केदार काळवणे, डॉ. विठ्ठल भंडारे, डॉ. वसंतराव भोसले, डॉ. सूर्यकांत देशमुख, प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, सौ. कविता सुभेदार, ॲड. मंगेशराव सुभेदार, सौ. मृणालताई सुभेदार, डॉ. मिनाताई टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले व कै. सौ. कमलताई जामकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हेमंतराव जामकर यांच्या हस्ते डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. आशा गीरी यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका मांडली. डॉ. विठ्ठल भंडारे आणि डॉ. केदार काळवणे यांनी दोन्ही पुस्तकांवर अभ्यासपूर्ण भाष्य करत लेखिकेच्या विचारमंथनाचे कौतुक केले. विजयराव जामकर व डॉ. वसंतराव भोसले यांनी डॉ. आशा गीरी यांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis