
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : नांदगावपेठ एमआयडीसी परिसरातील मुख्य चौफुली रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत डिगरगव्हाणच्या प्रशासक जिलेश्वरी ठाकरे यांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर चौफुली रस्ता डिगरगव्हाण, डवरगाव, कापूसतळणी, माळेगाव, गुरुकुंज मोझरी, माहुली जहांगीर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे येथे जडवाहनांसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
मात्र, या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात आणि परिणामी वारंवार अपघात घडत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत या चौफुलीवर 8 ते 10 अपघात झाले असून, त्यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यावर योग्य आकाराचे चार गतिरोधक तात्काळ उभारावेत, तसेच पांढरे पट्टे आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष देऊन उपाययोजना केल्यास संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी