
नाशिक, 28 एप्रिल (हिं.स.) :शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांवर नाशिक महानगरपालिकेने पुन्हा एकदा अचानक कारवाई करत मोठी मोहीम राबवली. एमजी रोड ते शालीमार परिसरात रस्ते व पदपथांवरील अनधिकृत स्टॉल्स, फेरीवाले आणि अवैध साहित्य हटवण्यात आले.
या कारवाईदरम्यान ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले असून अनधिकृत फलकही काढून टाकण्यात आले आहेत. पायी चालण्यासाठी अडचण निर्माण झाल्याच्या तसेच वाहतुकीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून सातत्याने येत होत्या.
एमजी रोड, दहीपूल ते मेनरोड, गाडगे महाराज पुतळा परिसर, शालीमार आणि भद्रकाली मार्केट या भागांमध्ये अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली, तर उर्वरित ठिकाणी महापालिकेच्या पथकाने साहित्य जप्त केले. जप्त केलेले साहित्य आडगाव येथील गोदामात जमा करण्यात आले आहे.
ही मोहीम मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेमुळे मध्यवर्ती भागातील रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV