प्रगणकांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन!
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)।अकोला जिल्ह्यात दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान ''स्व-गणना'' व त्यानंतर प्रगणकांमार्फत दि. 16 मे ते 14 जूनदरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. प्रगणकांना अचूक माहिती सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधा
Photo


अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)।अकोला जिल्ह्यात दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान 'स्व-गणना' व त्यानंतर प्रगणकांमार्फत दि. 16 मे ते 14 जूनदरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. प्रगणकांना अचूक माहिती सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. आपल्या एका अचूक माहितीवर पुढील 10 वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच स्व-गणना म्हणजे नागरिक स्वतः मोबाईलद्वारे माहिती भरू शकतात. दिनांक 1 ते 15 मे 2026 दरम्यान https://se.census.gov.in या वेबसाईटवर माहिती भरावी. ज्यांनी स्व-गणना केली नसेल तरीसुध्दा त्यांच्या घरी शासनाचा अधिकृत प्रगणक येईल.

नागरिकांना विनंती करण्यात येते की, घरी येणाऱ्या प्रगणकाकडे शासनाचे ओळखपत्र व नियुक्ती पत्र असेल. ते खात्री करूनच माहिती द्यावी, कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव, वय, शिक्षण, व्यवसाय यांची खरी व अचूक माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये, सहकार्य करावे. प्रगणक हे आपले सेवक आहेत, त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक देऊन परिपूर्ण माहिती द्यावी. सध्या आपल्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने आपल्या घरी येणा-या प्रगणकांना घराबाहेरच न थांबवता त्यांना घरात बोलावून पिण्याच्या पाण्याबाबत विचारणा करावी.

जनगणना कायदा 1948 नुसार सर्व वैयक्तिक माहिती 100 टक्के गोपनीय राहणार आहे. ती कोणत्याही न्यायालयीन किंवा महसुली कामासाठी वापरली जात नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा जनगणनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तसेच ओटीपी, बँक तपशील, आधार प्रगणक मागत नाहीत.

अकोला जिल्ह्याने नेहमीच शासकीय उपक्रमात पुढाकार घेतला आहे. डिजिटल जनगणनेतही आपला जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील, असा मला विश्वास आहे. 'तुमची नोंद, तुमचा विकास' हे ब्रीद लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी स्व-गणना करावी व प्रगणकांना पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande