छत्रपतींबाबत कथित अवमानकारक वक्तव्य; बागेश्वर बाबांविरोधात कारवाईची मागणी
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्या
Photo


अकोला, 28 एप्रिल (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली.शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे धडक देत तक्रारवजा निवेदन सादर केले.

नुकत्याच नागपूर येथे 25 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची, दिशाभूल करणारी तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असल्याचेही नमूद करण्यात आले.

उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, धीरेंद्र शास्त्री हे ‘दैवी दरबार’च्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असून आता त्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावरच आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रयत्न केला आहे. “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.

भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिकात्मक प्रतिमा पायदळी तुडवत निषेध नोंदवला.

तसेच “अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याने संबंधितांवर महाराष्ट्रात बंदी घालावी,” अशीही मागणी शिवसैनिकांकडून यावेळी करण्यात आली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande