अकोला जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी; डिकॉय कारवाया वाढल्या
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील जिल्हा लिंग गुणोत्तर प्रमाण 2023 मध्ये 919 व 2024 मध्ये 922 इतके नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याचा सरासरी गुणोत्तर 2024 मध्ये 912 इतका आहे. जिल्ह्यात लिंग संतुलन सुधारण्यासाठी व अवैध गर्भलिंग नि
अकोला जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी; डिकॉय कारवाया वाढल्या


अकोला, 28 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील जिल्हा लिंग गुणोत्तर प्रमाण 2023 मध्ये 919 व 2024 मध्ये 922 इतके नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याचा सरासरी गुणोत्तर 2024 मध्ये 912 इतका आहे. जिल्ह्यात लिंग संतुलन सुधारण्यासाठी व अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांच्या अधिनस्त एकूण 40 सोनोग्राफी केंद्रे व 19 गर्भपात केंद्रे नोंदणीकृत आहेत. तसेच अकोला महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त 155 सोनोग्राफी केंद्रे व 86 गर्भपात केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांची समुचित प्राधिकारी यांच्यामार्फत दर तिमाही नियमित तपासणी केली जाते.

गर्भलिंग निदान किंवा अवैध गर्भपात करणे, तसेच त्यासाठी मदत करणे हे “गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 1994 (सुधारित 2003)” नुसार गंभीर गुन्हा असून दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी किंवा इतर व्यक्तीस 1 लाख रुपयांपर्यंत दंड तसेच 3 ते 5 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

जिल्ह्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी डिकॉय केस (स्टिंग ऑपरेशन) राबविण्यात येत आहेत. सन 2024-25 मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत जिल्ह्यात 3 व विभागीय आदेशानुसार जिल्ह्याबाहेर 2 असे एकूण 5 स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये कारंजा (जि. वाशिम) येथे यशस्वी कारवाई करून न्यायालयीन प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

तसेच सन 2025-26 मध्ये आतापर्यंत 4 डिकॉय केस राबविण्यात आल्या असून अकोट येथील टावरी मेडिकलवर यशस्वी कारवाई करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अकोला महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फतही 5 डिकॉय केस करण्यात आल्या आहेत.ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून तिचा उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे, कन्या भ्रूणहत्या थांबवणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध गर्भपात किंवा गर्भलिंग निदानाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा टोल फ्री क्रमांक 18002334475 / 104 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यास तसेच यशस्वी स्टिंग ऑपरेशनसाठी बनावट ग्राहक महिलेस प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहुरकर यांनी दिली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande