
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार राज्य सेवा हक्क आयोग तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज, 28 एप्रिल 2026 रोजी अकोला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिकरीत्या सेवा हक्क दिनाची शपथ घेतली. या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला मनपा उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, सहा. आयुक्त विठ्ठल देवकते, जनगणना विभाग प्रमुख अनिल बिडवे, गजानन मुरतळकर, संतोष नायडू, कैलास भिरड, प्रशांत राजुकर, मीष कथले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा संदेश देण्यात आला.--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे