
कोल्हापूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। शिरोली तालुका हातकणंगले येथील एका तरुणांने 10 ते 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्या सहकाऱ्यांसह आर्थिक आणि शारीरिक शोषण केले. एका पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शाहिद समीर सनदे वय 22 असे नाव असलेल्या या तरुणाने लव जिहाद केल्याच्या संतापाचा उद्रेक आज शिरोली गावात झाला. गावातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आज गाव बंद ठेवून हजारोच्या संख्येने एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. संबंधित तरुणांसह त्याला मदत करणाऱ्या सर्वांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध केला. त्यामुळे शिरोली गावात वातावरण तणावपूर्ण बनले. निषेध मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने काही संघटनांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी झाली. 'लव जिहाद' हाच उद्देश ठेवूनच अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या शाहिद सनदे आणि त्याच्या साथीदार यांच्यावर तमाम ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
भाजपचे आमदार अमल महाडिक, जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने, शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, नामदेव गिरी, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, भाजप जिल्हा सदस्य सतीश पाटील, शिरोलीचे माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, अर्जुन चौगुले, बजरंग दलाचे निलेश शिंदे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते गाव कडकडीत बंद ठेवून शिरोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानी जवळ जमले. इथूनच शिरोली ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून जात असताना पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून मोर्चा काढण्यास बंदी घातली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, स.पो.नि. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस दलासह मोठा फौज फाटा घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम तरुणांचा तिव्र निषेध करण्यात आला. तसेच भाजप आमदार अमल महाडिक म्हणाले की संबंधित तरुणांनी अत्यंत घाणेरडे कृत्य केले आहे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. असे कृत्य कोणी करू नये यासाठी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. सर्वांना अटक होऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी. यासाठी एसआयटी मार्फत तपास व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. शिवसेना उपनेते संजय पवार यांनी अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले. आमदार अशोकराव माने यांनी समाजातील अशी कीड समुळ नष्ट केली पाहिजे यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा इशारा दिला. माजी सरपंच कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बोलताना सांगितले की संबंधित तरुणाच्या घराचे लाईट, पाणी, गॅस कनेक्शनसह सर्व सुविधा काढून घेऊन त्याचे अतिक्रमण नष्ट करण्यात येईल. तसेच त्याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये अशी विनंती वकील संघटनांना करणार आहे. तर या प्रकरणात सहभागी आणि सहकार्य करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी नेत्यांनी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar