
नाशिक, 28 एप्रिल (हिं.स.)। गेल्या साडेतीन दशकांपासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न एका भोंदू बाबाच्या नातेवाईकांकडून झाला आहे. निफाड तालुक्यातील भोंदू महेशगिरी काकडे बाबा याच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी 'अंनिस'चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना लाचेचे आमिष दाखवण्यात आले. याप्रकरणी चांदगुडे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी काकडे बाबा याच्यावर नुकताच गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याचा 'दरबार' बंद झाला आहे. यामुळे संतापलेल्या बाबाच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी आता समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे तंत्र अवलंबले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६.५६ वाजता, एका राजकीय कार्यकर्त्याचा मध्यस्थ म्हणून वापर करून भोंदू बाबाच्या भाच्याने कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण मिटवून घ्या, बाबाचा भाचा पैसे देण्यास तयार आहे, असे आमिष या मध्यस्थामार्फत दाखवण्यात आले. चांदगुडे यांनी तत्काळ या प्रकाराचा निषेध करत मध्यस्थाला फटकारले आणि ही बाब पोलीस प्रशासनाच्या कानावर घातली. या गंभीर प्रकारानंतर कृष्णा चांदगुडे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली. सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे विकत घेण्याचा प्रयत्न करणे हा चळवळीचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चौकट
लाच घेण्याप्रमाणे लाच देणे पण गुन्हा आहे. या प्रकारामुळे माझ्या व चळवळीच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये, हा संदेश देण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, अंनिस)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV