छ. संभाजीनगर - परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी 21 मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल, (हिं.स.)। परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफला
छ. संभाजीनगर - परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी 21 मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल, (हिं.स.)। परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीमध्ये विविध शाखांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी शाखेसाठी 25, वास्तुकला शास्त्रासाठी 6, व्यवस्थापनासाठी 3, विज्ञानासाठी 15, वाणिज्य/अर्थशास्त्रासाठी 9, कला शाखेसाठी 9, विधी शाखेसाठी 5 आणि औषध निर्माण शास्त्रासाठी 3 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्षे राहील. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे सन 2025-26 या वर्षाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत तर पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक राहतील. तसेच परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असणे आवश्यक आहे. कंडिशनल ऑफर लेटर ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ts.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीनेही सादर करावी. अर्जाचा नमुना, शासन निर्णय, कागदपत्रांची यादी व सविस्तर माहिती https://obebahujankalyan.maharashtra.gov.in तसेच https://dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे, आकार प्रिमायरोरा, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – 411006 येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande