
नाशिक, 28 एप्रिल (हिं.स.) : नाशिक महापालिकेच्या सहा प्रभाग सभापती पदांसाठी मंगळवारी (दि. 28) भाजप-शिंदेसेना आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी (दि. 30) होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांसाठी ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये भाजपला 5 तर शिंदेसेनेला एक प्रभाग सभापती पद देण्यात आले आहे. त्यामुळे सहाही प्रभागांमध्ये महायुतीचा ‘क्लीन स्वीप’ निश्चित मानला जात आहे.
नाशिकरोड, पंचवटी, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि सातपूर या सहा प्रभागांसाठी गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत स्थायी समिती सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
संख्याबळामुळे महायुती मजबूत
महायुतीकडे सर्व प्रभागांमध्ये बहुमत असल्याने निकाल पूर्वनिश्चित असल्याचे चित्र आहे. विशेषतः नाशिकरोड प्रभागात भाजप व शिंदेसेनेचे एकत्रित संख्याबळ ठाकरे गटापेक्षा जास्त असल्याने येथे शिंदेसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे.भाजपने या निवडणुकीत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये मंगला नन्नावरे, रोहिणी पिंगळे, समाधान देवरे आणि बाळकृष्ण शिरसाठ यांचा समावेश आहे.
विभागनिहाय उमेदवार
नाशिक पूर्व – मंगला नन्नावरे (भाजप) विरुद्ध अख्तर जामिया जावेद (काँग्रेस)
नाशिक पश्चिम – सुरेश पाटील (भाजप)
पंचवटी – रोहिणी पिंगळे (भाजप)
सातपूर – समाधान देवरे (भाजप)
नवीन नाशिक – बाळकृष्ण शिरसाठ (भाजप)
नाशिकरोड – रमेश धोंडगे (शिंदेसेना) विरुद्ध प्रमिला मैद (ठाकरे गट)
राष्ट्रवादी पुन्हा बाजूला
महापालिकेच्या सत्तेत यापूर्वीप्रमाणेच या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही महत्त्वाचे स्थान मिळाले नाही. सहा प्रभागांपैकी एकाही ठिकाणी त्यांचा सभापती होण्याची शक्यता दिसत नाही.
नेत्यांची प्रतिक्रिया
शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले की, महायुतीमध्ये समन्वय राखून वाटप करण्यात आले असून नाशिकरोडचे पद शिवसेनेला देण्यात आले आहे.
भाजप गटनेते ऍड. श्याम बडोदे यांनी स्पष्ट केले की, पाच ठिकाणी भाजपचे सभापती होतील, तर मित्रपक्षाला योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल.
एकूणच, संख्याबळ आणि युतीच्या एकजुटीमुळे नाशिक महापालिकेतील प्रभाग सभापती निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV