
चंद्रपूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावात नदीकाठाजवळ कपडे धुवत असताना वडिल, मुलगी आणि त्यांची भाची वर्धा नदीत बुडाल्याची घटना मंगळवारी समोर आली. या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बुडालेल्यात राजू कोडापे (४०), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (१२) आणि भाची प्रियांका मडावी (१४) यांचा समावेश आहे.
धानोरा गावालगतच्या वर्धा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता यावेळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने राजू कोडापे हे खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. वडील बुडत असल्याचे पाहून मुलगी अर्पिता त्यांना वाचवण्यासाठी नदीत धावली. मात्र, तिलाही पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. यानंतर भाची प्रियांका मडावी हिने वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने तिलाही बाहेर पडता आले नाही आणि तिघेही पाण्यात बुडाले.
राजू कोडापे हे राजुरा तालुक्यातील खामोना येथील रहिवासी असून ते आपल्या मुलगी अर्पितासह धानोरा येथे बहिणीकडे आले होते. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली असून मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची नोंद घुग्घुस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव