
नाशिक, 28 एप्रिल (हिं.स.) : सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामूहिक शपथ देत नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) प्रदीप वर्पे तसेच नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अमोल दंडगव्हाळ आणि राहुल देवरे (जिल्हा प्रकल्प प्रमुख, महा आयटी) यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सन 2025-26 या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्याचा प्रशासनाचा संकल्प अधोरेखित झाला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV