
परभणी, 28 एप्रिल, (हिं.स.)। रिजर्व बँक व सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत वाल्मिकी को-ऑपरेटिव्ह बँक पाथरीच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्याचा ठाम संकल्प असल्याचे प्रतिपादन बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन आदित्य नखाते यांनी केले. बँकेचा आर्थिक स्तर सातत्याने उंचावत ठेवण्यासाठी पारदर्शक आणि नियमबद्ध कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात मंगळवारी आयोजित भव्य सत्कार समारंभात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. वाल्मिकी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. पाथरीच्या चेअरमनपदी आदित्य अनिलराव नखाते यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, महसूल अधिकारी स्वप्ना परदेशी, मुख्याध्यापक एन. ई. यादव, मुख्याध्यापक के. एन. डहाळे, प्राचार्य आर. व्ही. कांबळे तसेच पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी सुमित वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदित्य नखाते म्हणाले, संस्थापक अध्यक्ष अनिलराव नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारण्यावर भर दिला जाईल. गरजू व होतकरू सभासदांना नियमांच्या चौकटीत राहून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असेही त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यात बँकेचे कर्मचारी, मान्यवर, विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चेअरमन आदित्य नखाते यांचा उत्स्फूर्त सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis