
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।मागील काही वर्षात जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने घेतलेल्या परिश्रमांना आता खरा आकार येत आहे. धाराशिव जिल्ह्याने आरोग्य सेवेत घेतलेली झेप त्याचे जिवंत उदाहरण आहे. आता गंभीर आजारांच्या उपचारासाठी सोलापूर किंवा पुण्याला धाव घेण्याची गरज उरणार नाही. कोट्यवधींच्या निधीतून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आता आपल्या दारी आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता आणि सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन या सगळ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
तब्बल ३६१.५ कोटी रुपये खर्चून ५०० खाटांचे भव्य जिल्हा रुग्णालय उभारले जात आहे, हृदयविकारावर मात करण्यासाठी २३१ कोटींच्या निधीतून कार्डीयाक कॅथलॅब सज्ज होत आहे. हृदयविकाराचे उपचार आता आपल्याच शहरात होतील, २३.७५ कोटींतून ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट जिथे MRI, ICU आणि डायलिसिससारख्या सुविधा एकाच छताखाली असणार आहेत, माता-बाल संगोपन १०० खाटांचे विशेष MCH विंग रुग्णालय माता आणि नवजात बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत होत आहे.डेंग्यू, मलेरियापासून ते रक्ताच्या सर्व महत्त्वाच्या चाचण्या IPHL लॅबमुळे आता आपल्या जिल्ह्यातच मोफत होतील
ग्रामीण भागाचाही कायापालट!
केवळ धाराशिव शहरच नाही, तर परंडा, वाशी, भूम, शिराढोण, अनाळा आणि वालवड सारख्या ग्रामीण भागातही उपजिल्हा रुग्णालये आणि ट्रोमा केअर युनिट्सचे काम पूर्ण होत आहे. सामान्य माणसाला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. 'आरोग्य सेवा आपल्या दारी' ही संकल्पना आता धाराशिवमध्ये प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. हा केवळ विकास नाही, तर आपल्या जिल्ह्याच्या सुरक्षित भविष्याची ही नवी पहाट आहे!
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis