धवललक्ष्मी ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीच्या दिशेने
रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : डहाणू येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडलेले ‘धवललक्ष्मी’ नावाचे ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास करून आता रत्नागिरीच्या दिशेने येत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. हे कासव रत्नागिरीतील एखाद्या कि
धवललक्ष्मी ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीच्या दिशेने


रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : डहाणू येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडलेले ‘धवललक्ष्मी’ नावाचे ऑलिव्ह रिडले कासव १८०० किलोमीटरचा प्रवास करून आता रत्नागिरीच्या दिशेने येत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. हे कासव रत्नागिरीतील एखाद्या किनाऱ्यावर अंडी घालणार का, याबाबत उत्सुकता आहे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये डहाणू समुद्रकिनारी एक ऑलिव्ह रिडले कासव जखमी अवस्थेत सापडले होते. वन विभाग आणि कांदळवन कक्षाने त्यावर यशस्वी उपचार केले. त्यानंतर त्याचे ‘धवललक्ष्मी’ असे नामकरण करून २० नोव्हेंबर २०२५ रोजी पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवून त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्था आणि कांदळवन कक्ष या प्रवासावर सतत लक्ष ठेवून आहेत. डहाणूतून सुटल्यानंतर धवललक्ष्मीने सोमनाथ, पोरबंदर मार्गे प्रवास करत ओमानच्या दिशेने झेप घेतली होती. फेब्रुवारी हा कासवांच्या प्रजननाचा काळ असल्याने ती ओमानला जाईल असा अंदाज होता. मात्र तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळत तिने अरबी समुद्रात मुक्काम केला. ३० मार्चनंतर तिचा वेग काहीसा मंदावला होता, मात्र २० एप्रिल रोजी ती रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यापासून ८०० किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळले आहे. याला कांदळवन कक्षाने दुजोरा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande