
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ, जिल्हा लातूर यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि. २७ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्माघाताने होणाऱ्या परिणामामुळे जिल्हाधिकारी यांनी आजच्या आज ग्राम रोजगार सहाय्यकांच्या आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालयाला पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ग्राम रोजगार सहाय्यकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी, तसेच इतर प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व रोजगार सहाय्यकांनी १ एप्रिल पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, अनेक वेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रोजगार सहाय्यक, जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली.
त्यानुसार सोमवार दि. २७ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ग्राम रोजगार सहाय्यकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालयाला पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ग्राम रोजगार सहाय्यकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चांद शेख, अमोल घायाळ, अवधूत खाडप, माधव शिंदे, माधव चव्हाण, अश्रुबा जाधव यांच्यासह अनेक रोजगार सहाय्यक सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis