
गडचिरोली, 28 एप्रिल, (हिं.स.) - गुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे आज दुपारी ११ वाजता गडचिरोली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.डॉ. कुंभारे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निष्ठावंत अनुयायी होते. त्यांनी त्यांच्या परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आयुष्यभर अविरत कार्य केले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कार्यतत्परतेमुळे अनेकांना प्रेरणा व दिशा मिळाली. त्यांनी कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य तसेच अण्णा हजारे यांच्यासोबत अनेक वर्षे सामाजिक कार्य केले. दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी भागात जाऊन त्यांनी लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते .
वैद्यकीय सेवा आणि लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये त्यांनी तब्बल ५० वर्षे योगदान दिले.गडचिरोली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, झाडीबोली साहित्य मंडळ, दारूबंदी आंदोलन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती यांसारख्या विविध संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, साहित्यिक आणि जनआंदोलन क्षेत्रात शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond