
नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : बिलोली तालुक्यातील 14 ते 15 वयोगटातील मुली तसेच पात्र महिलांनी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रभावी असलेले एचपीव्ही (HPV) लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन बिलोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राजपूत यांनी केले आहे.
डॉ. राजपूत यांनी सांगितले की, भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून तो मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या लसीकरण मोहिमेत एचपीव्ही लसीकरणाला विशेष महत्त्व दिले आहे.
ही लस 14 ते 15 वयोगटातील मुलींना प्रभावीपणे दिली जाऊ शकते. यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच चामखीळ आणि मसांपासून संरक्षण मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर या लसीबाबत वंध्यत्व किंवा मेंदूविकार होतात अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगत, ही माहिती पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
“मी स्वतः माझ्या मुलीचेही एचपीव्ही लसीकरण केले आहे,” असे सांगत डॉ. राजपूत यांनी लसीबाबतचा विश्वास अधोरेखित केला. ही लस उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध असून पालकांनी कोणतेही गैरसमज न बाळगता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis