
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.) : शिक्षण आणि संस्कार यांच्या संगमातून आदर्श पिढी घडवण्याचा संदेश देणाऱ्या संस्कार एक्स्पोची उत्साहात सांगता झाली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ मूल्य संस्कार विभाग आणि महासत्संग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी, पालक आणि सेवेकरी परिवार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सांगता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले की, “शिक्षण आणि संस्काराच्या एकत्रित संयोगातून भारतासाठी आदर्श पिढी निर्माण होईल.” त्यांच्या विचारांनी संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले असून उपस्थितांना नवी दिशा मिळाली. संस्कार आणि संस्कृतीच्या जतनासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला आमदार विलास भुमरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दयानंद पाटील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विवेकानंद कॉलेजचे अध्यक्ष तुषार शिसोदे तसेच नरेंद्र जबिंदा आणि राजेंद्र जबिंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विविध संस्कारप्रधान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित केली.
संस्कार एक्स्पोच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची रुजवण होत असून, भविष्यात अशा उपक्रमांची व्याप्ती अधिक वाढवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis