
नंदुरबार, 28 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सोमवार, 4 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी दिली.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकशाही दिन’ आयोजित केला जातो. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी प्रथम तालुकास्तरावर मांडणे आवश्यक आहे. जर त्या पातळीवर समाधानकारक निर्णय मिळाला नाही, तर नागरिकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’मध्ये आपले निवेदन सादर करण्याची संधी दिली जाते.
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर