
दिंडोरी, 28 एप्रिल (हिं.स.) : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड शिवारात पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी २४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वैध मापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या ‘ओमसाई’ पेट्रोल पंपाच्या वार्षिक तपासणीसाठी आवश्यक शासकीय शुल्क भरून ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार वणी विभागाचे वैध मापनशास्त्र निरीक्षक भगवान प्रल्हाद डोल्हारे हे प्रत्यक्ष पाहणीसाठी गेले होते.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक नोजलमागे सहा हजार रुपये, अशा एकूण २४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
ठरलेल्या ठिकाणी आरोपी निरीक्षक डोल्हारे हे लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांचा समावेश होता. तसेच पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी. यासाठी १०६४ या टोलफ्री क्रमांकासह इतर संपर्क माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV