
अमरावती, 28 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात लिंग समानतेला प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे. नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आता सर्वप्रथम आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम अनिवार्य करण्यात आला आहे. हा नियम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू होणार असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील शासकीय, अनुदानित तसेच खासगी शाळांसह सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांवर हा नियम लागू राहणार आहे. शाळा प्रशासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असून, नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांच्या सर्व अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव प्रथम क्रमांकावर झळकणार आहे. यात हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश-निर्गम उतारा यांसारख्या सर्व शैक्षणिक दस्तावेजांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख आता अधिकृतरीत्या मातेच्या नावाशी जोडली जाणार आहे.
विभक्त किंवा घटस्फोटित पालकांच्या बाबतीत आईचे नाव प्राधान्याने वापरण्यात येईल. तसेच दत्तक मुलांच्या बाबतीत दत्तक आईचे नाव नोंदविणे आवश्यक राहील. विशेष परिस्थितीत बदल करायचा असल्यास जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.शाळांमधील दैनंदिन व्यवहारातही या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. हजेरी घेताना किंवा विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख करून देताना “आईचे नाव + वडिलांचे नाव + आडनाव” असा क्रम पाळणे आवश्यक असेल. उदाहरणार्थ, “सीमा रमेश पाटीलचा मुलगा/मुलगी” असा उल्लेख करणे अनिवार्य राहणार आहे.
राज्य शासनाने हा निर्णय महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजात लिंग समानतेची जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगितले आहे. मातेची भूमिका अधोरेखित करणे, तसेच मुलांची ओळख मातेशी जोडणे हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे सामाजिक स्तरावर सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिलांना कुटुंब आणि समाजात अधिक सन्मान मिळावा, तसेच मुलांच्या ओळखीत आईचे स्थान अधिक दृढ व्हावे, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कागदपत्रांवर झळकेल आईचे नाव
हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम उतारा यासह सर्व अधिकृत दस्तऐवजांवर आईचे नाव प्राधान्याने छापले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी