
परभणी, 28 एप्रिल (हिं.स.)। शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत जनार्दन वाघमारे लिखित ‘मुठभर माती’ हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देणारे व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी- मराठी ग्रंथालय, सेलू यांच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमाच्या 39 व्या पुष्पात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘मुठभर माती’ हे आत्मचरित्र मराठवाड्याचा सर्वांगीण पट मांडणारे असून त्यातून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनाचे वास्तव चित्र उभे राहते. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीही शिक्षण व गुणवत्तेच्या जोरावर मोठी झेप घेऊ शकते, हा संदेश या आत्मचरित्रातून प्रभावीपणे मिळतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. उत्तम राठोड होते. यावेळी स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या दिलीप डासाळकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रवि मुळावेकर, डॉ. दिगंबर घोडके, माधव गव्हाणे व गणेश माळवे यांचा ग्रंथालयाच्या वतीने अध्यक्ष प्रा. डॉ. उत्तम राठोड, मान्यवर महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर व हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रभाकर रावते यांनी केले, तर सूत्रसंचालन आम्रपाली खाजेकर यांनी केले. आभार प्रदर्शन कथाकार डॉ. रमेश बोराडे यांनी केले. या प्रसंगी डॉ. वसंत पांचाळ, अशोक उफाडे, पांडुरंग पाटणकर, हरिहर खिरे, शांतकुमार धर्माधिकारी, गजानन देऊळगावकर, विठ्ठल कटारे, शिवाजी दळवे, रवींद्र पाठक, डॉ. शाम आवटे, आर. एम. खाडपे, सुभाष मोहकरे, अण्णासाहेब बोराडे, विनायक धामणगावकर, यशवंत चारठाणकर, दत्तात्रय माकोडे व खंडागळे डी. जी. आदी उपस्थित होते. दरम्यान, लातूर नगरपरिषदेत निवडून आल्यानंतर जनार्दन वाघमारे यांनी आपल्या आत्मचरित्रात सेलू येथील स्व. श्रीरामजी भांगडिया व प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांचा आदर्श आपल्या समोर असल्याचा उल्लेख केला आहे. ही बाब सेलूकरांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis