
नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बँका आणि एटीएममध्ये रोकड (चलन) टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खासगी बँकांमध्येही मर्यादित प्रमाणातच रोख रक्कम उपलब्ध करून दिली जात असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अनेक एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने नागरिकांना एका एटीएममधून दुसऱ्या एटीएमकडे भटकावे लागत आहे. लग्नसराईचा हंगाम, सुट्ट्यांमधील प्रवासाचे नियोजन तसेच दैनंदिन आर्थिक गरजा यावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे.
ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटबाबत जागरूकतेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. माहूर तीर्थक्षेत्रात मागील 15 दिवसांपासून एटीएम आणि बँकांमध्ये रोकड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. उमरी येथे स्टेट बँकेचे एटीएम अनेक महिन्यांपासून बंद असल्याची माहिती आहे.
नायगाव, कंधार आणि लोहा तालुक्यातही मागील काही दिवसांपासून अशीच स्थिती असून एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. देगलूर परिसरातही बँका आणि एटीएममध्ये रोकड नसल्याचे चित्र आहे.
नांदेड शहर आणि परिसरातील काही एटीएम कार्यरत असले तरी त्यातून केवळ 100 किंवा 200 रुपयांच्या नोटाच मिळत असल्याने मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना अडचणी येत आहेत. बँकांमध्येही आवश्यकतेनुसार रोख रक्कम उपलब्ध करून दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.----------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis