
रायगड, 28 एप्रिल (हिं.स.)। : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी डॉ. गीतांजली समीर महामुणकर यांची प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाधिष्ठित बदल आणि अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. महामुणकर या विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकी विभागात सन २००५ पासून कार्यरत आहेत. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयात पीएच.डी. संपादन केली असून भूस्थानिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधन लेखांचे प्रकाशन स्प्रिंगर, एल्सेव्हियर यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये झाले आहे.
सध्या त्या विद्यापीठाच्या भूस्थानिक तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राच्या (Centre of Excellence for Geospatial Technology) समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तसेच रिमोट सेन्सिंग व जीआयएस विषयातील एम.टेक. अभ्यासक्रमाच्या समन्वयक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी रुची निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
डॉ. महामुणकर यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संगणक अभियांत्रिकी, डेटा विश्लेषण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाला गती मिळणार आहे.
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी नियुक्तीपत्राचे औपचारिक प्रदान करून डॉ. महामुणकर यांचे अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. अमित शेष, अधिष्ठाता एस. एल. नलबलवार, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच वरिष्ठ प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)