
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर हे गाव कांदा उत्पादनासाठी ओळखले जाते. सध्या गावात कांदा काढणी व कापणीला सुरुवात झाली असली तरी बाजारपेठेत मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. मात्र या पिकासाठी बी पेरणीपासून ते काढणी आणि वाहतूकपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मोठा खर्च आणि मेहनत घ्यावी लागते. शेतकऱ्यांच्या मते, एका एकरासाठी सुमारे ९५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा काढणीसाठी बाहेरून मजूर आणावे लागत असून, त्यासाठीच एकराला सुमारे २० हजार रुपये खर्च होत आहे. शेत दूर असल्याने मजुरांच्या ने-आणसाठी ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भार वाढत आहे.
त्यातच बुरशी, करपा रोग आणि वाढत्या तापमानाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन कमी आणि बाजारभावही घसरलेला असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी सहसा खरीप हंगामासाठी काही कांदा साठवून ठेवतात, जेणेकरून पुढील पिकांसाठी खर्च भागवता येईल. मात्र सध्याच्या पडत्या दरामुळे हे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, कांद्याला हमीभाव, अनुदान किंवा आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात कांदा उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी